झोपेतच प्राण सोडल्याची प्राथमिक माहिती
खेड:- तालुक्यातील तळे मांडवे येथे रात्रीच्या सुमारास जेवून झोपलेल्या एका १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद आणि अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मयुरी कैलास जगताप (वय १६, रा. तळे मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही ७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून आणि टीव्ही बघून आपल्या आई-वडील व भावंडांसोबत खोलीत झोपण्यासाठी गेली होती. यादरम्यान, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खबर देणारे आणि मयुरीचे मामा राजेंद्र रामचंद्र वाघे हे टीव्ही पाहत असताना त्यांना जोरजोरात घोरण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने मयुरीच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती बेशुद्धावस्थेत होती व तिची कोणतीही हालचाल होत नव्हती.
तिच्या तोंडावर पाणी मारूनही तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि तिला उलटी झाली. यानंतर तातडीने १०१ क्रमांकावर संपर्क साधून, तिचे वडील कैलास बाळा जगताप आणि चुलत आजी सुमित्री रामचंद्र वाघे यांच्या मदतीने मयुरीला उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.









