आईची हत्या करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी:- आईची हत्या करून स्वतःच्या नसा कापून घेणारा तरुण अजूनही अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. या तरुणाने कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी यामागे आणखी काही कारण आहे का, याबाबतच्या सर्व शक्यताही पोलिस तपासणार आहेत. त्या दृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या शांतीनगर भागातील अनिकेत शशिकांत तेली या २५ वर्षीय तरुणाने मंगळवारी पहाटे आपल्या आईच्या गळ्यावर सुरीने वार केला. आई बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून घेतल्या. तशाच रक्ताळलेल्या हातांनी तो आजीकडे गेला आणि त्याने हा प्रकार तिला सांगितला. घाबरलेल्या आजीने शेजारी राहणाऱ्या आपल्या दुसऱ्या मुलाला याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी अनिकेतला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वडिलांनी आणि स्वतः काढलेल्या कर्जाला आणि बेरोजगारीला कंटाळून त्याने आईची हत्या केली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र फक्त आर्थिक विवंचना एवढेच त्यामागे कारण आहे की, अजून काही कारणे आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. अनिकेतला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही कंगोरे आहेत का, हे तपासले जात आहे. पोलिस निरीक्षक विवेक पाटील अधिक तपास करत आहेत.