संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने चालक अनिकेत नारायण लाड (वय ३०, रा. पाचल, ता. राजापूर) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र सुचित शांताराम गुरव (वय ३१, रा. वसई, जि. पालघर) हा रस्त्यावर फेकला जाऊन जखमी झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील पाचल येथील रहिवासी असलेला अनिकेत लाड हा आपली यामाहा कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच. ०३ ई.ई. ८३५६) चालवून वसई येथून मित्र सुचित गुरव याच्यासह आपल्या गावाकडे निघाला होता. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत पोहोचली असता अनिकेतचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगात व बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे दुचाकी रस्त्यालगत असलेल्या लोखंडी संरक्षक पत्र्यावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, आदळल्यानंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या धडकेत चालक अनिकेत लाड याच्या शरीराला गंभीर अंतर्गत मुक्कामार लागून तो जागीच ठार झाला, तर सुचित गुरव हा जखमी झाला.
या अपघातानंतर सुचित शांताराम गुरव याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयत चालक अनिकेत नारायण लाड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. सणासुदीच्या काळात गावी परतत असताना ऐन उंबरठ्यावर तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे.









