तरुणीवर अत्याचार प्रकरणी दापोलीतील तरुणाला अटक

दापोली:- वीस वर्षीय तरुणीवर मुंबई व दिल्ली येथे नेऊन अत्याचार करून तिला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या दापोली तालुक्यातील नवशी येथील सागर सुरेश जाधव याला गजाआड करण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जाधव याने फोन करण्यासाठी तिचा मोबाईल मागून घेतला व तिच्या मोबाईलवरून तिचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतले. त्याने ते फोटो ‘मॉर्फ’ करून तिचे अश्लील फोटो बनवले व तिला या आधारे तो ब्लॅकमेल करत होता. अखेर ब्लॅकमेलला कंटाळून व घरच्यांच्या जीवाला सागर काही बरं-वाईट करेल, अशी भीती वाटल्याने ही युवती त्याच्याबरोबर पळून जायला तयार झाली. ते पळून गेले, त्याच दिवशी २ तासात सागरने त्या मुलीला तिच्या घरी आईला फोन करून मी लग्न केले आहे, एवढेच बोलण्याची अनुमती दिली होती. यानंतर ते मुंबईला पळून गेल्याचे पोलिसात नमूद केले आहे.

अखेर पोलिसांच्या जाळ्यात लोकेशन समजू नये, यासाठी ते मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई पुन्हा मुंबई ते दिल्ली असा चार दिवस ते प्रवास करत होते. यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन तपासणे कठीण बनले होते. मात्र सागर जाधव हा बुधवारी सकाळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.