गुहागर कीर्तनवाडी येथील घटना
गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील गणपती कारखानदार मंगेश माटल (४५) याच्यावर एका तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या मंगेश माटल या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. हल्लेखोर तरुणाचा शोध पोलीस घेत होते.
हल्लेखोर तरुणाने मंगेश माटल याच्यावर कीर्तनवाडी येथील घरी जाऊन कोयत्याने वार केले. यात माटल याचा चेहरा, मान, डोके आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. माटल याच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी तातडीने रत्नागिरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सायंकाळी उशिरा फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले होते.









