चिपळूण:- शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी परिसरातील मधुबन पार्क येथील एका डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सागर वसंतराव पाटील (वय ३९, रा. मधुबन पार्क, फ्लॅट नं. २०७, गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १२ मे रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून ते १९ मे रोजी पहाटे ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकर फोडण्यात आला. लॉकरमधील सोन्याचे दागिने तसेच चांदीची भांडी असा एकूण सुमारे ४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, अंगठ्या, बांगड्या, वेढण, कॉईन, कानातील दागिने तसेच चांदीची समई, भांडी व इतर वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.









