रत्नागिरी:- ‘तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे’ आणि ‘तुमच्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे’ अशी भीती दाखवून रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल २५ लाख २७ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली या व्यक्तीला मानसिक दडपणाखाली ठेवून ही मोठी फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१, रा. जयगड-साखरी बौद्धवाडी) यांनी तक्रार दिली असून, तीन अज्ञात आरोपींविरुद्ध जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी जाधव यांना तीन अज्ञात इसमांनी वारंवार फोन करून आपण ‘नाशिक पोलीस’ बोलत असल्याचे भासवले. आरोपींनी जाधव यांना सांगितले की, तुमचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असून तुमच्या बँक खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याचे खोटे सांगून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले.
आरोपींनी जाधव यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ राहण्यास भाग पाडले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सॲपवर पोलीस विभागाचे लोगो असलेले बनावट पत्र पाठवले, ज्यावर फिर्यादींचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि फोटो छापलेला होता. “तुमच्या खात्यातील पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तपासावे लागतील, ते पुन्हा मिळतील” असे सांगून आरोपींनी त्यांना घाबरवून सोडले.
बँक खाते ‘व्हेरीफाय’ करण्याच्या बहाण्याने आरोपींनी जाधव यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २५ लाख २७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी जयगड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), २०४, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ अन्वये नोंदवला आहे.









