‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटी लुटणारा भामटा मुंबईतून जेरबंद

रत्नागिरी:- सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.

नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सायबर भामट्यांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला (निवृत्त प्राध्यापक, दापोली) फोन करून “आम्ही बेंगळुरू पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत आहोत” अशी बतावणी केली. “तुमच्या मुंबईतील कॅनरा बँक खात्यातून ३ कोटींचा मनी लाँड्रिंग फ्रॉड झाला आहे,” अशी भीती घालून त्यांना घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ (व्हिडिओ कॉलद्वारे नजरकैदेत) ठेवले. या चौकशीतून सुटण्यासाठी आणि बँक खाते व्हेरिफिकेशनसाठी भामट्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल १ कोटी २३ लाख रुपये विविध बँक खात्यांत भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.

​फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आल्यानंतर, बँकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई व ठाणे परिसरात स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. २३ जानेवारी २०२६ रोजी एका आरोपीला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
​या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस हवाल्दार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम, रोहन कदम आणि निलेश शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.