टेरव येथे वन विभागाच्या धाडीत 30 पोती कोळसा जप्त

चिपळूण:-  दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील टेरव येथील ग्रामस्थांनी गावातील कोळसा भट्ट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती.  वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसणार्‍या कोसळा भट्ट्यांवर यापुर्वी धाड टाकली होती. त्या नंतर मंगळवारी पुन्हा वन विभागाने या गावात मोहीम राबवली. यामध्ये एका ठिकाणाहून 30 पोती कोळसा जप्त केला. या कारवाईमुळे कोळसा भट्टीवाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहे. मात्र, पुन्हा भट्ट्या धगधगत असल्याचे पुढे आले आहे.

टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठविला होता. वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

निवेदन दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी ठाम होते. त्यानुसार वन विभागाने नोहेंबरमध्ये टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्ट्यांवर धाड टाकली होती. या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला होता तर टेरव येथील संतोष कदम, बाबुराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हे दाखल केला होता. तसेच त्यांच्याकडून 47 घनमीटर लाकूड जप्त केले होते.

कोळसा भट्टी लावण्यास बंदी असताना देखील कोळसाभट्ट्या लावल्याप्रकरणी बाबूराव कदम व नागेश कदम यांच्यावर याआधीच गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना अजूनही टेरव येथे सातत्याने कोळसा भट्ट्या धगधगत आहेत.

याबाबतची माहिती मिळताच येथील परिक्षेत्र वनाधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. यामध्ये 30 पोती कोळसा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.