रत्नागिरी:- महावितरणच्या विविध टेंडर प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी शांताई कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटरवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ एप्रिल २०२५ ते १७ जून २०२५ या कालावधीत नाचणे रोड येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात घडली.
या प्रकरणात संतोष मनोहर फटे (वय ४४ वर्षे
व्यवसाय: प्रोप्रायटर, शांताई कन्स्ट्रक्शन, मंगळवेढा, जि. सोलापूर) या संशयिताने बनावट डिक्लरेशन बॉन्ड देत देऊन फसवणूक केली आहे. याबाबत अनुराधा सुरेशराव आंधनसरे (वय ४५ वर्षे, सध्या रा. युनिटी पार्क, थिबा पॅलेस रोड, जैन कॉलनी, रत्नागिरी; मूळ रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी संतोष फटे याने यापूर्वी एका टेंडरसाठी (EEC/RTN/eT-66/2024-25) वापरलेला ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर (क्र. CX 221194) डिजिटल माध्यमातून (PDF एडिट करून) फेरफार केला. त्यात कामाचे नाव बदलून, त्याची प्रिंट काढून व त्यावर टेंडरचा मजकूर लिहून तो महावितरणच्या आगामी तीन टेंडरसाठी (EEC/RTN/eT-01/2025-26, EEC/RTN/eT-05/2025-26, EEC/RTN/eT-06/2025-26) डिक्लरेशन बॉन्ड म्हणून महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड केला.
टेंडर मिळवण्यासाठी व फिर्यादीसह महावितरणची दिशाभूल करण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर, दिनांक २८ जुलै रोजी दुपारी २:३९ वाजता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









