रत्नागिरी:- जिल्ह्यातील टपाल कार्यालयात आता भीम पे, गुगल पे द्वारे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयात सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
पूर्वी ग्राहकांना टपाल कार्यालयात रजिस्टर, स्पीडपोस्ट, पार्सल बूक केल्यानंतर सर्वच व्यवहार कॅशमध्ये करावे लागत होते. त्यावेळी सुट्टे पैसे देण्याचा आग्रह केला जायचा शिवाय पैशांच्या देवाघेवाणीत वेळदेखील जास्त जायचा. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात आणि ऑनलाईन व्यवहारांच्या काळात नव्या पिढीची गरज ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील टपाल कार्यालयांनी युपीआय कार्यप्रणाली अंगीकारून क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयात मल्टीपर्पज काऊंटरवर रजिस्टर, स्पीडपोस्ट, पार्सल, बिझनेस पार्सल, इंटरनॅशनल लेटर आणि पार्सल्स, डायरेक्ट पोस्ट सर्व्हिस, विविध प्रकारच्या परीक्षा फी अशा विविध प्रकारच्या सेवांचे व्यवहार कॅशलेस होणार आहे. ही सुविधा सर्व नागरिकांसाठी 25 एप्रिलपासून टपाल कार्यालयाने सुरू केली आहे. या नव्या उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.









