लांजा:- लांजा येथील खावडकरवाडी भागात भाड्याने राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहितेचा झोपेत असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत सौ. जान्हवी महेश देवरुखकर (वय ३५) या मूळच्या राजापूर तालुक्यातील वडदहसोळ मिरजोळकरवाडी येथील रहिवासी असून, सध्या त्या लांजा खावडकरवाडी येथे प्रकाश जोशी यांच्या घरात पतीसह भाड्याने राहत होत्या. शनिवार, ९ मे २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास त्या घरात झोपलेल्या असताना अचानक झोपेतच थरथरू लागल्या.
त्यांच्या शरीराची हालचाल जाणवल्याने पती महेश यशवंत देवरुखकर यांनी तातडीने उठून घरातील लाईट लावली. त्यावेळी जान्हवी यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे आणि त्यांचे हातपाय थंड पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
पत्नीची अवस्था पाहून महेश देवरुखकर यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. त्यांना प्रथम खासगी स्वामी समर्थ हॉस्पिटल आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच ‘मयत’ घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पती महेश देवरुखकर यांनी दिलेल्या माहितीवरून लांजा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अकस्मात मृत्यू क्र. २९/२०२६) करण्यात आली आहे. सदर मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









