उत्पादन शुल्कची कारवाई ; 37 हजाराचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरातील झाडगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एका संशयितावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 37 हजाराची दारू जप्त केली आहे. मंगळवारी (ता. 16) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबर्यामार्फत मिळाली होती. या नुसार विभागीय उपायुक्त वाय. एस. पवार अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथकाने काल रात्री नऊ वाजता धाड टाकली. यावेळी मॅक्डॉल 1, रॉयल स्टॅग व्हिस्की व इतर असा 36 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्री. वैद्य भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटी, निनाद सुर्वे, विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार, रोहन तोडकरी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी स्वरूप संजय नरवणकर (वय 26, रा. झाडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पद्धतीने गोवा बनावट व गावठी दारूधंद्यावर कारवाया सुरू राहतील, असा इशारा उपाध्यक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी दिला.