झरीविनायक येथे रिक्षा चालकाची तरुणीला मारहाण

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये झरीविनायक येथे रिक्षा चालकाने तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मुक्तार अब्दुलसत्तार मुजावर (७२) यांनी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला.

रफिक मुअज्जम मुजावर (रा. भाट्ये रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मुक्तार मुजावर हे २० मार्च रोजी आपल्या ताब्यातील कारने (एमएच ०८ एएक्स ७५४२) इफ्तारीचे सामान घेवून रत्नागिरी पावस रस्त्याने जात होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रिक्षा (एमएच ०८ एक्यु ३७६४) वरील चालक रफिक यांने भाटये झरीविनायक येथे मुक्तार याच्या ताब्यातील कारला धडक दिली. यावेळी मुक्तार हे तक्रार देण्यासाठी शहर पोलिसांत जात असताना आरोपी रफिक याने तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी मुक्तार यांची मुलगी व तिची मैत्रिण वाद सोडविण्यासाठी मध्ये गेल्या असता, आरोपी याने मुक्तार यांच्या मुलीच्या मैत्रिणीला मारहाण केली. अशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.