रत्नागिरी:- प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड आग लागली आहे. आगीत हजारो हेक्टर आंबा बागायत जळून खाक झालीय. आग लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तही प्रचंड आक्रमक झाले आहेत. प्रकल्पग्रस्त भडकले असून, त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या गेट वरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण ही आग नेमकी कशी लागली हे अद्यापही समजू शकलेले नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, वनविभागाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान वरचेवर घटनास्थळी दाखल झाले. आग हळूहळू पसरत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. आजूबाजूला जंगल परिसर असल्यानं ही आग भडकत चाललीय.
प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेतील डीपीचा स्फोट झाला, त्या स्फोटानंतर ही आग भडकली. माडबन परिसरात आगीचे आगडोंब उठले असून, आंबा आणि काजू कलमे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थ आक्रमक झालेले असून, आगीनंतर ग्रामस्थांचा जमाव प्रकल्पाच्या गेटवर आलाय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारनंतर ही आग लागली. जैतापूर प्रकल्पाच्या आत डीपीचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केल जातोय. त्यानंतर वाऱ्यासोबत ही आग भडकत गेली. आगीचे लोण जैतापूर प्रकल्पाच्या बांधलेल्या भल्यामोठ्या भितींवरून सुद्धा सहज दिसत होते. आग वाऱ्यासोबत भडकत गेली.
थेट माडबनच्या गावातील हद्दीपर्यंत ही येऊन पोहोचली. आग वाढत होती. जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणी आग विझवण्याची कुठलीच यंत्रणा नाही. त्यामुळे आग भडकत गेली. माडबन गावाच्या हद्दीमधील आंबा आणि काजू कलमे देखील या भीषण आगीत जळून खाक झाली. जवळपास साडेचार तास उलटून अग्निशमन दलाची यंत्रणा इथं आग विझवण्यासाठी पोहोचली नाही. जैतापूूर अणुऊर्जा प्रकल्प राजापूरपासून 35 किलोमीटर तर रत्नागिरीहून 60 हून अधिक किलोमीटर आहे. पण प्रकल्पाच्या ठिकाणी आग विझवण्याची यंत्रणा नसल्याने ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून आग विझवली. पण आग पूर्णतः आटोक्यात आलेली नाही.









