संगमेश्वर:- पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या जुन्या वादातून संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी-येडगेवाडी येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वादात एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, सात ते आठ जणांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५) आणि आरोपी हे एकाच वाडीत राहणारे आहेत. त्यांच्यात पिण्याची पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून, शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादींना गाठले आणि वाद उकरून काढला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी सुरेश बाबू येडगे आणि पांडुरंग बाबू येडगे यांनी फिर्यादींना लाकडी काठीने मानेवर व पाठीत जोरदार मारहाण केली. “याला मारून टाका,” असे ओरडत अन्य आरोपींनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थापटांनी मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपींनी फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी शंकर येडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी सुरेश बाबू येडगे, पांडुरंग बाबू येडगे, सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे व इतर दोन ते तीन अनोळखी इसम या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १८९(२), ११०, १९१(२), ११८(२), ३११(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.







