जीआय नोंदणीकृत शेतकर्‍यांना क्यूआर कोड देण्यासाठी करार

रत्नागिरी:- ग्राहकांना अस्सल हापुस आंबा मिळावा आणि शेतकर्‍याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकर्‍यांसाठी क्यू आर कोड उपलब्ध करून दिले आहेत. हापुस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यू आर कोड लक्ष्य ठेवले आहे. क्यूआरकोडसाठी मीरो लॅब कंपनीबरोबर करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. त्यासाठी मानांकन देण्यासाठी निवडलेल्या संस्थांमध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थचा समावेश आहे. जीआय नोंदणीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरु आहेत. ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्युआरकोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यू आर कोड ला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. मागीलवेळच्या त्रुटी दूर करुन यंदा क्यूआर कोड नव्याने निर्माण केलेेले आहेत. त्यामध्ये मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परीपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकर्‍याची माहिती त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टी कोडमार्फत मिळू शकतात. चांगल्या आंब्यामुळे शेतकर्‍याला सतत ग्राहक मिळत रहावा यादृष्टीने कोडमध्ये सुधारणा केल्या गेल्या.
आंब्यावरील क्यूआरकोड 65 पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. प्रचार, प्रसार, शिबीरे घेणे व शेतकर्‍यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रम उत्पादक संस्था घेत आहे. शासनाच्या एखाद्या योजनेमधून संस्थेला अनुदान मिळाले तर संस्था दहा पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकते व बागायतदारांना आणखीन कमी दरामध्ये मार्केटिंगसाठी क्यूआरकोड पुरवू शकेल असे संस्थेकडून सांगण्यात आले. संस्थेची स्वतःची वेबसाईट नेहमी अपडेट होत असते आणि त्यावर वेळोवेळी माहितीही दिली जाते.