Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ गावे, १२९ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई

जिल्ह्यातील ५५ गावे, १२९ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई

42 हजार 635 ग्रामस्थांना टंचाईची झळ

रत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढू लागल्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. ग्रामीण भागातील विहिरी आणि पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटू लागल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ५५ गावे आणि १२९ वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ हजार ६३५ लोकसंख्या बाधित झाली आहे.

प्राप्त आकडेवारीनुसार, रत्नागिरी तालुक्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे. रत्नागिरी तालुक्यातील १० गावे आणि 39 वाड्यांमधील २३ हजार ७११ नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागात पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक १० खाजगी टँकर्स धावत असून आतापर्यंत १०७८ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. रत्नागिरीखालोखाल संगमेश्वर तालुक्यातही परिस्थिती चिंताजनक आहे. येथील १५ गावे आणि ३१ वाड्यांमधील ६ हजार ५१८ लोकांना पाणीटंचाईची झळ पोहोचत असून, तिथे १ शासकीय आणि २ खाजगी टँकरद्वारे पाणी पोहोचवले जात आहे.
दुसरीकडे, मंडणगड तालुक्यातील ६ गावे आणि ६ वाड्यांमध्ये १ खाजगी टँकरद्वारे २१४ फेऱ्या मारून ५ हजार २६५ लोकांना दिलासा दिला जात आहे. चिपळूण तालुक्यातील १० गावे आणि २४ वाड्यांमधील २ हजार ९१५ नागरिक पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. खेड तालुक्यात ११ गावे आणि २१ वाड्यांमध्ये १ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून येथील 1 हजार ४१६ लोक बाधित आहेत. दापोली आणि गुहागर तालुक्यातही टँकरच्या फेऱ्या सुरू असून येथील अनुक्रमे १८०३ आणि १००७ नागरिक प्रभावित झाले आहेत.

या संपूर्ण भीषण परिस्थितीत लांजा आणि राजापूर तालुक्यांना मात्र सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये अद्याप एकाही गावात किंवा वाडीत टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता, सद्यस्थितीत एकूण ३ शासकीय आणि १५ खाजगी अशा १८ टँकर्सच्या माध्यमातून आतापर्यंत १६४४ फेऱ्या मारून टंचाईग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून, गरज भासल्यास आणखी टँकर्स तैनात करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.