Sunday, May 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी

जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी

उकाड्यापासून दिलासा, पण आंबा बागायतदार चिंतेत

रत्नागिरी:- जिल्ह्यात आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल होऊन रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, यंदा अश्विनी आणि कार्तिकी नक्षत्रात पावसाचा हा मुहूर्त सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, मात्र दुसरीकडे अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा व्यवसायाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​गेल्या दोन आठवड्यांपासून कोकण किनारपट्टीवर तापमानाचा पारा वाढला होता. उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज पहाटेपासूनच आकाशात काळे ढग जमा झाले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन नागरिकांना कडक उन्हापासून आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

​यंदा नक्षत्रांची गणिते पाहता, अश्विनी आणि कार्तिकी नक्षत्रात पावसाची ही सुरुवात अत्यंत शुभ मानली जात आहे. हा पाऊस आगामी खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरेल, या आशेने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या या शुभ आगमनामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीकामांच्या पूर्वतयारीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक अंदाजानुसार यंदाचा पावसाळा शेतीसाठी समृद्धीचा ठरेल, असा विश्वास ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

​एकीकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक या पावसामुळे आनंदी असले, तरी दुसरीकडे मात्र हा पाऊस हापूस आंबा बागायतदारांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सध्या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक बागांमध्ये अजूनही आंबे झाडावरच आहेत, तर काही ठिकाणी काढणी करून ते बाजारपेठेत पाठवण्याची तयारी सुरू होती. अशातच झालेल्या या जोरदार पावसामुळे झाडावर असलेल्या आंब्यांवर डाग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. काढणी केलेला आंबा ओला झाल्यास तो सडण्याची शक्यता वाढली आहे. वाहतुकीत आणि पॅकिंगमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​पहाटेपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला होता. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना आणि विशेषतः मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आंबा उत्पादकांनी आपल्या मालाची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.