Sunday, September 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेमध्ये ९४६ गंभीर आक्षेप

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेमध्ये ९४६ गंभीर आक्षेप

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या जलजीवन मिशन योजनांच्‍या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या पथकाने २ हजार ११ वेळा केलेल्‍या प्रत्‍यक्ष पाहणीत ९४६ गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. त्‍यापैकी ८८४ आक्षेप प्रशासनाने निकाली काढले असले तरी ७२ आक्षेपांची पूर्तता अद्याप झालेली नाही. या दिरंगाईबद्दल जिल्‍हा परिषदेच्‍या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

जिल्‍ह्यात जलजीवनच्‍या १ हजार ४२८ योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. तपासणी दरम्‍यान निकृष्ट काम, कागदपत्रे अपूर्ण व तांत्रिक चुका अशा नऊ प्रकारच्‍या त्रुटी आढळल्‍या. विशेषत: रत्‍नागिरी तालुक्‍यातील चित्र चिंताजनक आहे. येथे १८२ योजनांच्‍या तपासणीत १४९ त्रुटी आढळल्‍या असून त्‍यापैकी तब्‍बल २४ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत, जे जिल्‍ह्यात सर्वाधिक आहेत. तसेच दुसरीकडे मंडणगड तालुक्‍याने मात्र सर्वांसमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. १०४ योजनांच्‍या तपासणीत आढळलेले सर्व ७६ आक्षेप या तालुक्‍याने १०० टक्‍के पूर्ण केले आहेत.