जिल्ह्यात आणखी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून पुढील 48 तासांत दक्षिणेकडून किनारी भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे कमी होणार आहेत, तर उत्तरेकडून राज्याकडे येणार्‍या थंड वार्‍यांचे प्रमाण अजूनही कमी आहे. या थंड वार्‍यांचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली, तरी बोचरी थंडी अद्याप पडलेली नाही. पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तर भारतात झाला आहे. त्यामुळे या भागात दाट धुके आणि थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे किनारपट्टी भगात प्रभावी थंडी पडलेली नाही. पहाटे आणि सकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे. त्या नंतर दुपारपासून सायंकाळपर्यंत वातावरणात एक प्रकारचा उष्मा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी थंडी पडत असल्याचे वातावरण आहे.