रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून, २४ जानेवारी रोजी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी ग्रामीण भागात विविध ठिकाणी धाडी टाकून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत विदेशी दारू आणि गावठी हातभट्टीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
चिपळूण तालुक्यातील कोंढे, कळेवाडी येथे आरोपी महेद्र गंगाराम कळे (वय ५०) याच्या घरामागील मोकळ्या जागेत पोलिसांनी छापा टाकला. यावेळी २१० रुपये किमतीच्या ‘डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्की’च्या १८० मिलीच्या एकूण ९ बाटल्या (एकूण किंमत १,८९०/- रुपये) जप्त करण्यात आल्या. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मारोती वागदकर यांनी ही फिर्याद दिली असून चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.
निवळी-तारवेवाडी रोडवर सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या उद्देशाने बसलेल्या राजेंद्र संभाजी मालप (वय ४३, रा. निवळी) याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने त्याच्यावर कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथे नारळ-पोफळीच्या बागेत गावठी दारूची विक्री करत असताना वासुदेव धर्मा मोहीते (वय ७८) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ५५० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
गावडेआंबेरे येथील जुवळेवाडीत एका घराच्या बाजूला केळीच्या झाडाच्या आडोशाने अवैध दारू बाळगल्याप्रकरणी श्रीमती अरुणा अनंत गोलटकर (वय ६५) यांच्यावर पूर्णगड सागरी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा एकूण ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संगमेश्वर येथील पावटा मैदान परिसरात नदीकिनारी झुडपाच्या आडोशाने अवैध दारूची विक्री करणाऱ्या अनंत सोमा जाधव (वय ५७, रा. मांभळे) याच्यावर संगमेश्वर पोलिसांनी झडप घातली. आरोपीकडून ९७५ रुपये किमतीची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.









