टेस्टींग वाढवून पॉझिटीव्हीटी रेट कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न- ना. सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना संशयितांची टेस्टींग वाढवून पॉझिटीव्हीटी रेट कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्ह्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्ह्याचा मृत्यू दर राज्याच्या तुलनेत 1.2 टक्केने अधिक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील कोरोना बाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट वाढून दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये गेले आहेत. सध्या जिल्ह्याच्या रेट 17 टक्केहून अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टेस्टींगची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्टींग वाढल्यास पॉझिटीव्हीटी रेट कमी होणार आहे. जिल्ह्यात सध्या मृत्यू दर 3.32 टक्के इतका आहे. राज्याच्या तुलनेत हा दर एक टक्क्याने अधिक आहे. मृत्यू दर कमी व्हावा यासाठीही विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजनचा साठा 12 टनापर्यत वाढवला आहे. ऑक्सिजन बफर स्टॉकमध्ये असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. जिल्ह्यात महिला रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय, रायपाटण उपजिल्हा रुग्णालय, राजापूर उपजिल्हा रुग्णालय व ओणी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये नव्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली.