रत्नागिरी:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि संबंधित नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि या सर्व प्रवर्गातील स्त्रियांसाठी तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी ही सोडत पद्धतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही विशेष सभा त्या त्या संबंधित ठिकाणी होणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जिल्हा नियोजन समिती सभागृह.याशिवाय मंडणगड पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मंडणगड, दापोली पंचायत समिती नवभारत छत्रालय, शिंदे सभागृह, दापोली, खेड पंचायत समिती श्री काळकाई मंदिर सभागृह (पहिला मजला), भरणे नाका, खेड, चिपळूण पंचायत समिती
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, चिपळूण, गुहागर पंचायत समिती पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, गुहागर, रत्नागिरी पंचायत समिती शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद, रत्नागिरी, संगमेश्वर पंचायत समिती छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, संगमेश्वर (देवरुख), लांजा पंचायत समिती तहसीलदार कार्यालय सभागृह, लांजा, राजापूर पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद राजापूर (मुंबई गोवा महामार्ग नजीक) येथे आरक्षण सोडत होणार आहे.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या रहिवाशांना सदर सभेस हजर राहण्याची इच्छा असेल, त्यांनी नमूद केलेल्या ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.









