जि. प. भवनात कोरोनाचा शिरकाव

रत्नागिरी:- जिल्हा परिषद भवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी पुरते धास्तावले गेलेत. धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करा अशी मागणी गुरूवारी जि.प.अध्यक्ष, सीईओ यांच्याकडे केली आहे. 
 

आता जिल्हा परिषद भवनात कोरोनाचा धक्कादायक शिरकाव झाला आहे. या भवनात विविध विभागात काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱयांत चांगलीच खळबळ माजली आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह येऊनही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात न आल्याने धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड तसेच जि.प.अध्यक्ष रोहन बने यांची गुरूवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.  

या झालेल्या चर्चेवेळी कोरोनाचा पसार लक्षात घेता जि. प. कार्यालय 100 टक्के पशासकीय कामकाज बंद करणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले. पण कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केलेल्या मागणीनुसार पशासकीय कामकाज रोटेशन पध्दतीने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपस्थित पदाधिकाऱयांनी कर्मचाऱयांबाबतीत जे कर्मचारी 55 वर्ष आहेत, त्यांनी घरी राहून काम करण्याच्या सूचना द्याव्यात. जे कर्मचारी आजारग्रस्त आहेत, त्यांनाही सवलत देण्यात यावी. कार्यालयात कर्मचाऱयांना आवश्यकतेपमाणे रोटेशन पध्दतीने बोलावण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.