Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जागेच्या वादातून गळ्यावर सूरा चालवून संशयिताने स्वतःलाच केले जखमी 

जागेच्या वादातून गळ्यावर सूरा चालवून संशयिताने स्वतःलाच केले जखमी 

दापोली जालगाव येथील घटना

दापोली:- तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून एका आरोपीने वृद्ध घरमालकाला जीवे मारण्याची धमकी देत, स्वतःच्या गळ्यावर सूरा मारून घेत स्वतःला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “मला पैसे द्या, नाहीतर तुम्हाला गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी देत आरोपीने हा हायव्होल्टेज ड्रामा केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर भिकाजी यादव (वय ७६, मूळ रा. जालगाव, सध्या रा. वडाळा-मुंबई) हे आपल्या जुन्या घराची दुरुस्ती करत आहेत. यावेळी आरोपी महेंद्र सिताराम पवार याने त्यांच्या जागेत अनाधिकृतपणे घुसखोरी केली होती. यादव यांनी त्याला “तू जागेत घुसखोरी केली आहेस, आता येथे राहू नकोस,” असे सांगितले. याचा राग येऊन आरोपीने प्रथम यादव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मा रण्याची धमकी दिली.

काही वेळाने आरोपी महेंद्र पवार हा हातात मोठा सूरा घेऊन पुन्हा यादव यांच्या जागेत आला. त्याने पुन्हा शिवीगाळ करत, “मला या जागेचे पैसे द्या, नाहीतर मी स्वतःला सूरा मारून घेईन आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करून तुम्हाला अडकवीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने हातातील सूरा हवेत निष्काळजीपणे फिरवून स्वतःच्या गळ्यावर मारून घेतला, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे.

या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून आरोपीने बेकायदेशीरपणे जागेत प्रवेश केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वृद्ध घरमालकावर दबाव टाकण्यासाठी आरोपीने स्वतःला जखमी करून घेण्याचे हयगयीचे कृत्य केले आहे.

या प्रकरणी मनोहर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी आरोपी महेंद्र सिताराम पवार याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५(अ), ३२९(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.