रत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे चुलीवर पाणी तापविण्यासाठी चुल पेटवत असताना वृद्ध महिला भाजली. तिला वाचविण्यासाठी गेलेला तिचा मुलगा ही भाजला आहे. अधिक उपचारासाठी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
फातिमा अब्दुल रहिमान पागारकर (वय ८८) व असल्म पागारकर (रा. जांभारी, ता.जि. रत्नागिरी) अशी भाजलेल्या वृद्धेचे व मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फातिमा या घरातील चुलीवर पाणी तापविण्यासाठी चुल पेटवत होत्या. चुलीत त्यांनी कागद, प्लास्टिक टाकून चुल पेटविली असता अचानक आगीचा भडका उडाला. फातिमा यांच्या नायलॉनच्या साडीने पेट घेतला यामध्ये ती ६० टक्के भाजली. तिचा आरोडा-ओरडा ऐकून तिचा मुलगा अस्लम पागाकर आग विझविण्यासाठी गेला असता तोही काही प्रमाणात भाजला त्याचे दोन्ही हात भाजले आहेत. तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









