जयस्तंभ स्टेट बँकशेजारी संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात असलेल्या शकुंतला अपार्टमेंट मधील  बाजुबाजुच्या दोन सदनिका भरदिवसा फोडून अज्ञाताने 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला.घरफोडीची ही घटना गुरुवार 31 ज्ाुलै रोजी सकाळी 9.30 ते 11.15 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत सिमा सुनिल साळवी (रा.शकुंतला अपार्टमेंट,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,गुरुवारी सकाळी सिमा साळवी या डोळे तपासण्यासाठी सकाळी 9.30 वा.सुमारास डॉक्टरांकडे गेल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या भाच्याने त्यांना फोन करुन तुमच्या सदनिकेचा दरवाजा फोडला गेला असून चोरी झाली असल्याची माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच सिमा साळवी आपल्या घरी गेल्या असता त्यांना सदनिकेच्या दरवाजाची कडी-कोयंडी उचकटलेली दिसून आली. त्यांनी आतमध्ये जाउन पाहिले असता त्यांना लोखंडी कपाट उघडलेले तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांच्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 57 हजारांचा मुद्देमाल तसेच त्यांच्या सदनिकेच्या बाजुची सदनिका फोडून चोरट्याने त्याील चांदीच्या 3 हजार रुपयांचा वाट्या असा दोन्ही सदनिकांचा मिळून एकूण 60 हजारांचा ऐवज लांबवला.