रत्नागिरी:- कत्तलखान्यात जनावरे न्यायला गाडी आल्याचा गैरसमज करुन तरुणांचा पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीनंतर सारं वर्हाड पोलिस स्थानकात दाखल झालं आणि जनावरे कत्तलखान्यात नव्हे तर मित्राच्या मालकीचा पाडा घेऊन जाण्यासाठी चांदेराईतील तरुण आल्याचे उघड झाले आणि सारेच बुचकळ्यात पडले. रात्रभर पोलिस स्थानकात या वर्हाडाचा पाहुणचार झाला. मात्र दुसर्या दिवशी देखील त्याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
काही दिवसांपूर्वी कत्तलखान्यात गुरे घेऊन जाणारी गाडी पकडण्यात आली होती. त्यामुळे ज्याठिकाणी गुरांची वाहतूक होण्याची शक्यता आहे अशाठिकाणी विशेष लक्ष ठेवले गेले आहे. गुरुवारी रात्रीच्यावेळी एक टेम्पो गयाळवाडी येथे आला होता. जी व्यक्ती टेम्पो घेऊन आली होती त्या व्यक्तीचा मित्र मिरजोळे परिसरात राहणारा आहे. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करताहेत. मित्राने माझ्याकडचा पाडा ते घेवून जा असे चांदेराईतील मित्राला सांगितले. त्यानुसार मित्राचा पाडा नेण्यासाठी चांदेराई येथील एक तरुण आपल्या सहकार्यांना घेऊन रत्नागिरीत दाखल झाला. मित्राचा पाडा घरी नसल्याचे त्याचा शोध घेत ही सर्व मंडळी गयाळवाडीपर्यंत येवून पोहोचली. रात्रीच्यावेळी पाड्याचा शोध घेत असताना ही सर्व मंडळी एका घराजवळ आली आणि त्याठिकाणी प्यायला पाणी मागितले. त्यांना प्यायला पाणी मिळालं मात्र पाणी देणार्या व्यक्तीने त्यांना विचारले की तुम्ही इकडे काय करताय. त्यावेळी पाडा नेण्यासाठी आलो आहे असे त्यांनी सांगताच ज्या व्यक्तीने पाणी दिलं त्यांना वेगळाच संशय आला आणि मग सारे रामायण घडले.
पाणी पिण्यासाठी आलेली मंडळी ही संशयित असून कत्तलखान्यात गुरे नेणारी टोळी असावी असा समज करुन ज्या व्यक्तीने पाणी दिले, काही लोकांना फोन करुन याची कल्पना दिली आणि त्याची माहिती प्राणी मित्रांपर्यंत जावून पोहोचली. मग काय? वर्हाडींचा मोठा लवाजमाच गयाळवाडीच्या दिशेने रवाना झाला. त्या मुलांचा शोध सुरु झाला आणि त्या मुलांना शोधून त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले.
पकडलेल्या मुलांना कुठून आलात? याची विचारणा करता थेट मारहाण झाली. हातात भेटेल त्याने फटकवण्याचा कार्यक्रम झाला. या मारहाणीत एका मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मारहाणीचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर नंतर त्या मुलांना घेऊन सारे ग्रामीण पोलिस स्थानकात दाखल झाले.
पोलिसांनी त्या मुलांकडे चौकशी केली असता मित्राच्या मालकीचा पाडा न्यायला आलो आणि मित्रदेखील आमच्यात होता असे सांगून आपण शेतकरी असून आमची स्वत:ची गुरे आहेत अशी माहिती त्या मुलांनी दिली. त्यानंतर पोलिस देखील चांगलेच भांबावले. नेमका हा प्रकार काय? असा प्रश्न असतानाच चांदेराई गावातील ग्रामस्थ पोलिस स्थानकात दाखल झाले आणि नवा पेच निर्माण झाला. रात्रभर त्या मुलांना पोलिस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. ज्या प्राणी मित्रांनी त्यांना आणले ते मात्र दुसर्या दिवशी पोलिस स्थानकात आले नाहीत. त्यामुळे तक्रार देणार कोण? आणि तक्रार घ्यायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला होता. टेम्पोत जनावरे मिळून आली नाहीत मग जनावरांची वाहतूक कशी होवू शकते आणि गुन्हादेखील कसा दाखल करायचा असा प्रश्न ग्रामीण पोलिसांसमोर पडला होता. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत त्यावर ग्रामीण पोलिस स्थानकात चर्चा सुरु होती.