चोवीस तासात दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

मंडणगड:- मंडणगड शहरातून चोरण्यात आलेली दुचाकी मुद्देमालासह दुचाकी चोरास २४ तासाच्या आत अटक करण्याची कौतुकास्पद कामगिरी मंडणगड पोलिसांनी केली आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

या घटनेसंदर्भात पोलीस ठाणे मंडणगड येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहरातील सरकारी गोडाऊन येथे राजाराम महादेव लेंडे यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटारसायकल (एम. एच. ०८ एक्स ६१४६) उभी करण्यात आली होती. रविवारी सकाळी ७ वा. ही गाडी त्या जागेवरून चोरीस गेली असल्याचे लेंडे यांच्या निदर्शनात आले. यामुळे लेंडे यांनी तत्काळ मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करीत शहरातील चौकाचौकात तत्काळ नाकाबंदी लावली. यावेळी कसून तपास करीत

असताना त्याच रात्री १२.३० च्या सुमारास संशयित आरोपी इरफान सिराज मोमीन (२८, मंडणगड, धुत्रोली मोहल्ला) याच्या ताब्यात सदरची गाडी आढळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉस्टेबलदत्ताराम शांताराम बाणे करीत आहेत.

सदर तपासाची मोहीम पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल दत्ताराम शांताराम बाणे, एस. पी. मावची, पोलीस कॉस्टेबल वैभव गमरे, पोलीस पाटील रमेश जाधव यांनी पार पाडली.