Thursday, September 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूणातील दागिने चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा

चिपळूणातील दागिने चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा

आरोपी महिला ताब्यात, १४ लाखांचे दागिने हस्तगत

चिपळूण:- शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत घडलेल्या दागिने चोरीच्या धक्कादायक घटनेचा चिपळूण पोलिसांनी वेगाने छडा लावला आहे. अवघ्या २४ तासांच्या आत तपास पूर्ण करत आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले सुमारे ११ तोळे, अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही घटना दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात घडली होती. प्रवासासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केले होते. गर्दीच्या ठिकाणी क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पीडित महिलेने तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांची हालचाल पडताळणे आणि माहितीदारांच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. याच धाग्यांच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीत आरोपी महिलेला शोधून काढत ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा अवघ्या २४ तासांत तपास लावून आरोपींना अटक करण्याची कामगिरी मेंगडे यांनी केली होती. त्यानंतर लगेचच या दागिने चोरीप्रकरणाचाही जलद छडा लावून त्यांनी आपली कार्यक्षमता पुन्हा सिद्ध केली आहे.

पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या धडाकेबाज कामगिरीमुळे चिपळूण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.