चिपळूण:- गेल्या काही वर्षांपासून चिपळूणमध्ये सुरू असलेला सावकारी धंदा आणि पठाणी वसुलीचा अखेर पर्दाफाश झाला आहे.एका महिलेला २०हजार रुपये कर्ज देऊन त्यांच्याकडून २५ हजार रुपये वसूल करून देखील पुन्हा तब्बल १ लाख २०० रुपयांच्या पठाणी वसुलीसाठी तगादा लावून तिला मारहाण करून अश्लील शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात चिपळूणमध्ये सावकारी धंद्याला उत आला होता. गरजेला पैसे द्यायचे आणि नंतर त्याची पठाणी वसुली सुरू करून कर्जदाराला धमक्या देणे, घरातील वस्तू उचलून घेऊन जाणे ,असे प्रकार सतत सुरू होते. अनेक तरुण या धंद्यात उतरून आलिशान कार्यालये थाटून बसले आणि वसुलीसाठी तरुणांचे टोळके आणि तरुणी तसेच महिला देखील ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, चिपळूण वडनाका येथील अभिजित गुरव या तरुणाने आत्महत्या केली आणि सावकारी विषयाला उघडपणे वाचा फुटली.
या बाबत चिपळूण भेंडीनाका येथील बिलकीस अब्दूलकरीम परकार या महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीम.परकार यांनी सावकारी करणारे शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे आणि पूजा मिरगल यांच्याकडून २० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी त्यांनी १५ हजार रुपये प्रथम अदा केले.तसेच दंड म्हणून १० हजार रुपये देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. एकूण २५ हजार रुपये देऊन देखील त्यांच्यावर तब्बल १ लाख २०० रुपयांची थकबाकी काढण्यात आली.आणि वसुलीचा तगादा सुरू करण्यात आला असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नंतर मात्र वेळोवेळी धमक्यांचे फोन सावकाराकडून येऊ लागले. घरी येऊन धमक्या देणे पैशाची मागणी करणे तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करणे असे प्रकार सावकाराकडून सतत सुरू झाले. इतकेच नव्हे तर कार्यालयात बोलावून त्या महिलेला प्रचंड मारहाण करून "तू मेलीस तरी चालेल पण आमचे पैसे दे" असे धमकावत ठार मारण्याची धमकी देखील दिली.असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.चिपळूण पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्या नुसार पूजा मिरगल, शिवा खंडजोडे आणि चांगदेव खंडजोडे या तिघांवर बेकायदा पैशाची वसुली, जबरदस्ती, मानसिक व शारीरिक त्रास,मारहाण व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकर्णी कलम ३८६,३८४,३४८,३२३,५०४,५०६,तसेच सावकारी अधि.२०१४ चे कलम ४५व४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिपळूणात सावकारी प्रकरणात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आता चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे.त्यामुळे काहींनी आपले कार्यालये बंद केली आहेत.तर काहीजण चिपळूणमधून पसार झाले आहेत.
[28/06, 5:38 pm] RE-Pranil: