चिपळूण:- चिपळूण बाजारपेठ जुना स्टॅण्ड येथील स्वामी कॉम्प्लेक्समधील सपना एन्टरपायझेस, मेडिकलचे होलसेल दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरटयांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. मात्र एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने चिपळूणात खळबळ उडाली आहे. दोघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सज्जाद हसन कादरी (सावर्डे, अडरेकर मोहल्ला, चिपळूण), पर्शुराम हरिश्चंद्र पवार (21, उक्ताड, कानसेवाडी, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुजित विनायक डोळस (49, व्यवसाय ट्रव्हलिंग, जुना एसटी स्टॅण्डच्या बाजूला) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित डोळस हे 16 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास जुना स्टॅण्ड येथील स्वामी कॉम्प्लेक्समधील मोकळया बाल्कनीमध्ये शतपावली करत होते. यावेळी सपना एन्टरपायझेस या मेडिकलच्या होलसेल दुकानाचे लोखंडी रेलिंग सज्जाद कादरी व त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती फोडण्याचा पयत्न करत होता. हे पाहून कादरी यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. लोकांना पाहताच एक चोरटा पाठीमागील बाजूने पळून गेला. मात्र साजिद याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेल्या पर्शुराम पवार यालाही ग्रामस्थांनी पकडले. सज्जाद कादरी याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक लोखंडी रॉड व पँटमध्ये लोखंडी सळी, दोन मोबाईल, एक चाकू, लायटर अशा वस्तू मिळून आल्या. पोलिसांनी सज्जाद कादरी, पर्शुराम पवार यांच्यावर भादविकलम 457, 380, 511, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









