चिपळूणमध्ये ‘हिट अँड रन’चा थरार

कळंबस्ते फाट्यावर काळ्या ‘क्रेटा’ने तरुणाला उडवले; चालक फरार

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते फाटा येथे एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून अपघात करून चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २८ डिसेंबर रोजी रात्री ७:५० च्या सुमारास घडला. फिर्यादी अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख यांचा चुलत भाऊ निजामुद्दीन हसनअली शेख (वय ३६, रा. निरबाडे मोहल्ला, चिपळूण) हे कळंबस्ते फाटा येथे रस्ता ओलांडत होते. यावेळी मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून निजामुद्दीन यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात निजामुद्दीन यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी चालक गाडीसह वेगाने पळून गेला. या प्रकरणी अब्दुल रऊफ शेख (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात क्रेटा कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोंद २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:३४ वाजता करण्यात आली.

पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील कारचा नंबर अद्याप समजलेला नाही. पोलीस महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारचा आणि चालकाचा शोध घेत आहेत.