चिपळुणातील हॉस्पिटलमधील १० रुग्णांचा मृत्यू

ना. सामंत ; पाणी शिरल्याने दुर्घटना, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, १४०० जणांची सुटका

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे चिपळुणात भरलेले पाणी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या जिवावर बेतले. पुरामध्ये कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमधील ८ व अन्य सेंटरमधील २ अशा १० रुग्णांचा मृत्यू झाला. सेंटरमध्ये पाणी शिरल्याने ऑक्सिजनपासून संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ४०० जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी कोकण आयुक्त, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, कोळकेवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग हे एकच चिपळूण पुराचे कारण नाही. नवाजा आणि महाबळेश्वर येथे पडलेल्या पावसाचे पाणी चिपळूणमध्ये आले. त्यामुळे चिपळूणमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. कधी नाही एवढे म्हणजे ७ ते ८ फुट शहरामध्ये पाणी शिरले. नागरिकांना पुराचा अंदाज होता. म्हणून त्यांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलविले होते. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली. खेड येथील पोसरे गावात दरड कोसळून १७ जण अडकले आहेत. १० जण जखमी आहेत. खेडमधील आणखी एका घटनेत २ जण अडकले आहेत.

जिल्ह्यात आज १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चिपळूण कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमधील ८ जणांचा मृत्यू झाला. सेंटरमध्ये पाणी शिरल्याने ऑक्सिजनसह इतर सर्व यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या बाधितांचा मृत्यू झाला. अन्य एका कोविड सेंटरमधील २ जणांचा मृत्यू झाला आहे. पाणी ओसरल्याने शहरात आणि फिरलो. अतिशय भयावह परिस्थिती आहे. अन्य काही घरांमध्ये मृदहेद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढणार आहे.