चिपळुणातील अपघातात जखमी सिद्धेश काणेकरची मृत्यूशी अपयशी झुंज

नववर्षाच्या पूर्वसंध्येला झाला होता अपघात

चिपळूण:- एकतीस डिसेंबरच्या रात्री मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील पॉवर हाऊस येथे एस.टी. बस आणि दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या पेढे येथील सिद्धेश संदीप काणेकर या युवकाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर सिद्धेशला कराड येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल अकरा दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र अखेर शनिवारी रात्री ही झुंज अपयशी ठरली.

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करत असताना 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई-गोवा महामार्गावर कामथे, परशुराम घाट व शहरातील पॉवर हाऊस येथे तीन वेगवेगळे अपघात झाले. यामध्ये कामथे घाटातील अपघातात दोघां जागा मृत्यू झाला. इतर अपघातात एकूण पाचजण जखमी झाले होते. यापैकी पॉवरहाऊस येथील अपघातात दुचाकीवरील पेढे येथील सिद्धेश काणेकर, सौरभ नरळकर, शुभम नरळकर हे तिघेजण जखमी झाले होते. दुचाकीवरुन सिद्धेश, सौरभ आणि शुभम हे जेवण्यासाठी रात्री जात असताना पॉवर हाऊस येथे कोल्हापूर-रोहा या एस.टी. बसची दुचाकीला धडक बसली. यात ते तिघेजण जखमी झाले होते. यातील सिद्धेशच्या डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्याला कराड येथे खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. कराड येथे अकरा दिवस सिद्धेशवर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी रात्री त्याचे निधन झाले. 25 वर्षीय सिद्धेश हा पेढे येथे फरशी तिठा येथे रहात होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने पिंपळी आयटीआयमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल्स फ्लॅन्ट हा दोन वर्षा अभ्यासक्रम पूर्ण करून तो लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काम करू लागला. गेल्या दोन वर्षांपासून तो विनती कंपनीत सेवेत होता. सावातीला ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर अलिकडेच कायमस्वरूपी झाला होता. त्याच्या निधनाने पेढे गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी सिद्धेशवर स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने जनसमुदाय, त्या मित्रपरिवार उपस्थित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.