चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे येथे दोन कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. यात पाचजण जखमी झाले असून त्यात वयोवृध्द महिलेसह एका ७ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. या प्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकावर चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक विजय विचारे (मालवण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अमित रवींद्र भोसले (२५, खंडाळा) यांनी पोलिसात दिली. तसेच प्रदीप सुरेश काटकर (५०), दिव्या प्रदीप काटकर (७), सुमित्रा सुरेश काटकर (७५, सर्व-भांडूप), गुरुनाथ विश्राम नांदिसकर (६०, मालवण), बाळकृष्ण पर्शुराम भिलारे (५०, ठाकुर्ली) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक विचारे याने निष्काळजीपणाने तसेच भरधाव वेगाने कार चालवत होता. तो मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे येथे आला असता त्याने विरुध्द बाजूला येऊन अमित भोसले यांच्या गाडीला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात वरील पाचजण जखमी झाले. शिवाय अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, चिपळूण पोलिसांनी दीपक विचारे याला सीआरपीसी (४१) १ अ प्रमाणे नोटीस दिली आहे.









