राजापूर:- तालुक्यातील डोंगर फाटा येथे १७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने मारुती सुझुकी या गाडीला धडक दिली. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या ७ ते ८ अज्ञात इसमांनी सुझुकीमधील दोन युवकांना मारहाण करत त्यांच्याकडून फोन पेद्वारे चार हजार रुपये जबरदस्तीने हस्तांतरित करून घेतले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, राजापूर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी श्री. शशिकांत शंकर परब (वय ६०, रा. वेंगुर्ला) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ते त्यांचा मुलगा शुभम परब आणि हर्षल नागेश साटेलकर यांच्यासोबत मुंबईहून वेंगुर्ल्याकडे (एम.एच.०२ बी.पी.५९२२) या क्रमांकाच्या मारुती सुझुकी एस.एक्स.४ गाडीतून प्रवास करत होते. पहाटे साधारण ३.५० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राजापूर पूल ओलांडला आणि डोंगर फाटा येथे पोहोचले. याच दरम्यान, (एम.एच.१८ ए.जे.७०५६) क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.
अपघातानंतर स्कॉर्पिओमधून ७ ते ८ अज्ञात इसम गाडीतून उतरले. त्यांनी तात्काळ शुभम परब आणि हर्षल साटेलकर यांना शिवीगाळ करत हातांनी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर या दोघांकडून फोन पे अॅपद्वारे जबरदस्तीने ४ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार घडल्यावर संबंधितांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेतली. राजापूर पोलीस ठाण्यात अभिषेक परमेश्वर लोखंडे आणि त्याच्यासोबतच्या ७ ते ८ अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.