रत्नागिरी:- शहरात अंमलीपदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. झाडगाव-परटवणे परिसरात चायनिज सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी तब्बल एक किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. भरस्त्यात गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात राजरोसपणे चरस – गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना शहर पोलिसांनी अंमलीपदार्थ विक्रीविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तस्करांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. चायनिज सेंटर बाहेर गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या चायनिज सेंटरवर बारीक लक्ष ठेवले होते. त्यासाठी साध्या वेषातील पोलिसांनी सापळा लावला होता. गांजाची विक्री होत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणाचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने श्वान पथकासह धाड टाकून १ किलो गांजा हस्तगत केला. संशयित हेमंत पाटील विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिकारी समाधान पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे, मोबीन शेख, मीरा महामुने, कमल दुधाले, पोकॉ. अमित पालवे यांनी केली.