रत्नागिरी:- जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले असल्या तरच त्यांना चाचणी करावी लागणार नाही. मात्र, एक डोस झालेल्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, अशांना जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यात बाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केलेली असल्यास प्रवेशावेळी त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तथापि प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.









