Tuesday, August 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी घरात घुसला अन् कोयता घेऊन धमकावले, परप्रांतीय तरुणाला ग्रामस्थांकडून चोप

घरात घुसला अन् कोयता घेऊन धमकावले, परप्रांतीय तरुणाला ग्रामस्थांकडून चोप

राजापूर:- रेल्वेतून उतरलेला एक प्रवासी पोलिसांच्या भीतीने जवळच असलेल्या एका घरात शिरला आणि तेथीलच कोयता आणि घण हातात घेऊन घरातील लोकांना धमकावू लागला. लोकांनी समजावल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. काही तास सुरू असलेल्या या नाट्यमय प्रकारानंतर अखेर संतापलेल्या लोकांनी घराचा मागील दरवाजा फोडून त्या व्यक्तीला तुडवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सिनेमात शोभेल, असा हा प्रकार बुधवार, १ जुलै रोजी सायंकाळी तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वे स्थानकानजीक फणसवाडीमध्ये घडला.

बुधवारी मुंबईहून मांडवी एक्स्प्रेसमधून आलेला एक प्रवासी राजापूर रोड रेल्वे स्थानकावर उतरला. मात्र, स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहताच तो तेथून पळून जाऊन जवळच असलेल्या फणसवाडीतील प्रकाश श्रृंगारे यांच्या घरात शिरला. त्यावेळी घरात फक्त श्रृंगारे यांची आई होती, तर इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरात शिरताच त्या व्यक्तीने दरवाजा आतून बंद करून घेतला. घरातील कोयता व घण हातात घेऊन त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच प्रकाश श्रृंगारे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दरवाजा उघडण्यास नकार दिला. या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई यांना देण्यात आली. त्यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तसेच प्रभुदेसाई यांनी त्या प्रवाशाला समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिला.
दरम्यान, राजापूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. हा प्रकार परिसरात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. अखेर काही धाडसी ग्रामस्थांनी घराचा मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. यावेळी संतप्त जमावाने त्याला मारहाण केल्याची माहिती मिळाली.

या घटनेत पोलिसांनी वेळेवर ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच संशयिताला पोलिसांच्या वाहनातून न नेता रिक्षाने पोलिस स्थानकात पाठवल्याचीही परिसरात चर्चा सुरू आहे. त्याचा जबाब मिळाल्यानंतरच आता या प्रकरणाचा अधिक उलगड होण्याची शक्यता आहे.
हा प्रवासी कोण आहे, पोलिसांना बघून तो का पळला, तो गुन्हेगार आहे का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे अजून पुढे आलेली नाहीत.

पोलिसांनी याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा प्रवासी सध्या रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत.