रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शौकत मजिद सारंग (वय ५५, रा. गोळप मोहल्ला) हे गुरुवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोळप मशिदीजवळ होते. यावेळी आरोपी शैबाज युसुफ मजगावकर (वय ४९) याने फिर्यादींना “तुम्ही लग्नाला जाता की दारू प्यायला जाता?” असा प्रश्न विचारला.
या प्रश्नावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. फिर्यादीने “तू मला असे का बोललास?” असे विचारले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वाद टाळण्यासाठी शौकत सारंग हे तिथून आपल्या घरी निघून गेले.
फिर्यादी घरी गेल्यावर आरोपी शैबाज हा त्यांच्या घराजवळ पोहोचला आणि त्याने शौकत यांना पुन्हा मशिदीजवळ येण्यास सांगितले. शौकत मशिदीजवळ गेले असता, आरोपीने त्यांचा डावा हात धरून सोबत आणलेल्या सुरीने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि कपाळावर वार केले. या हल्ल्यात शौकत मजिद सारंग हे जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर शौकत सारंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.४६ वाजता गुन्हा नोंदवला आहे. आरोपी शैबाज मजगावकर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









