गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण वाढण्यावरून मारामारी

दापोली: दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे जुन्या भैरी देवाच्या गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण वाढण्यावरून झालेल्या वादानं इतकं विक्राळ रूप धारण केलं की, थेट मारामारीपर्यंत मजल गेली. या प्रकरणी आता दापोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकुर्डे येथील अमोल अशोक जोशी यांनी या घटनेसंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. देवाच्या गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू असताना, जेवणाच्या पंक्तीत अचानक वादंग निर्माण झालं. अमोल जोशी लोकांना जेवण वाढण्यासाठी पातेलं घेऊन पुढे सरसावले, पण त्याचवेळी संदीप लाड, अविनाश कांबळे आणि तुकाराम कलकर यांनी त्यांच्या हातातील पातेलं हिसकावून घेतलं. शाब्दिक वाद इतका वाढला की, या तिघांनी अमोल जोशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळही केली. धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणीच असा प्रकार घडल्यानं उपस्थितांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या घटनेनं कार्यक्रमाच्या पावित्र्याला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे.