Thursday, June 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गैरसमजातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गैरसमजातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण कळवंडेतील घटना

चिपळूण:- पूर्ववैमनस्यातून तसेच गैरसमजातून तीन जणांनी एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कळवंडे, वरपेवाडी येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश सिताराम गुरव (वय ६५, रा. कळवंडे, वरपेवाडी) हे २२ जून रोजी दुपारी २.४५ ते ३ च्या सुमारास आपल्या घराच्या मोकळ्या व्हरांड्यात बसले होते. दरम्यान, राजेंद्र जाधव, वीकेश गुरव आणि अंकश सुरेश गुरव (सर्व रा. चिपळूण) हे तिथे आले. फिर्यादी हे सुरेखा सुरेश गुरव यांना शिवीगाळ करत असल्याचा खोटा समज करून घेऊन या तिघांनी त्यांना लक्ष्य केले. यावेळी राजेंद्र जाधव याने फिर्यादीची मान धरून त्यांना थापटांनी मारून जमिनीवर पाडले.

त्यानंतर वीकेश गुरव याने काठीने फिर्यादीच्या पायावर व मानेवर प्रहार केले, तर अंकश सुरेश गुरव याने फिर्यादीच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर हाताने मारहाण केली. मारहाणीदरम्यान या तिघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात रमेश गुरव गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.