गॅस टंचाईवर सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

आता हॉटेलना मिळणार थेट पाईपलाईन गॅस कनेक्शन: पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. गॅसअभावी जिल्ह्यातील शेकडो हॉटेल्सची चूल विझली असून, अनेक मोठी हॉटेल्स चक्क बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. या गंभीर संकटाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला ‘युद्धपातळीवर’ कामाला लावले असून, तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने छोटे हॉटेल चालक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. पर्याय नसल्याने काहींनी जुन्या चुली पेटवून व्यवसाय टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र मोठ्या हॉटेल्सना हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याने त्यांनी थेट शटर डाऊन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. या परिस्थितीमुळे पर्यटनावर आधारित असलेल्या या जिल्ह्याच्या हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला असून व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत गॅस टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ज्या हॉटेल्सना शक्य आहे, त्यांना तातडीने ‘महानगर गॅस’ची पाईपलाईन जोडणी देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी नगरपालिका आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वेक्षण करून नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

गॅस वितरणात पारदर्शकता आणि समन्वय राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः ज्या छोट्या व्यावसायिकांना एक सिलिंडर १५ ते २० दिवस पुरतो, अशा गरजू व्यावसायिकांना साठा उपलब्ध होताच प्राधान्याने पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे संकटात सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.