गुहागरात उपसरपंचाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

संशयितास अटक; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा उपसरपंचाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा उपसरपंच 65 वर्षांचा आहे. घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. अशोक भुवड (६५, ता. गुहागर) असे या नराधम उपसरपंचाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिच्या घरचे बाहेर गेले होते. घरात इतर कोणी नसल्याची संधी साधत अशोक भुवड घरात शिरला. त्याने या मुलीचा विनयभंग केला. या प्रकाराने मुलगी घाबरली. तिने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. या प्रकाराने घरचेही घाबरले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी उपसरपंच अशोक भुवड यांच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आता मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.