गुहागर:- गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापारी प्रसाद संसारे (४६, जानवळे) यांचा पायऱ्या चढताना हृदयविकारामुळे जागीच कोसळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे शृंगारतळी बाजारपेठेवर शोककळा पसरली असून तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील तरुणांसह प्रसाद उर्फ बाळा संसारे गिरनार येथे शुक्रवारी सायंकाळी देवदर्शनासाठी गेले होते. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ६०० पायऱ्या चढून झाल्यावर ते जागीच कोसळले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याच्यासोबतच्या मित्रांनी शृंगारतळीत त्यांच्या नातेवाईकांना कळवली. हे वृत्त कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला. प्रसाद संसारेंचा मृतदेह रविवारपर्यंत शृंगारतळी येथे आणण्यात येईल, असे त्यांच्या नातेवाईकांकडून समजले. प्रसाद हे सर्व तरुणांमध्ये मनमिळावू म्हणून सर्वपरिचित होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.









