गुहागर तालुक्यात विजेचा धक्का लागून तरुण वायरमनचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील कर्दे येथे विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखिल नार्वेकर, (वय २३, रा. अडूर) या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १८) रात्री घडली. निखिल उत्तम कबड्डीपटू असल्याने अडूर गावाबरोबरच क्रीडाक्षेत्रात आणि महावितरणमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निखिल हा कर्दे परिसरात वायरमन म्हणून महावितरणमध्ये नोकरीला होता. कर्दे गावातील वीजप्रवाह खंडित झाल्याची माहिती त्याला मिळाली. किरकोळ दुरुस्ती असेल असा विचार करून निखिल आपल्या सहकार्याला न घेता कर्दे गावात गेला. तो विजेच्या खांबावर चढला. विजेचा धक्का लागून तो निखिल नार्वेकर खाली कोसळला. उंचावरून

जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. कर्देतील ग्रामस्थांनी तातडीने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी चिखली प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. शुक्रवारी (ता. १९) सकाळी चिखली येथेच विच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

निखिल नार्वेकरचे गाव अडूर. तेथील तृप्तीनगर कबड्डी संघाचा तो अष्टपैलू खेळाडू. उत्तम चढाईकार म्हणून गुहागर तालुक्यात त्याची ओळख आहे. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रात्री अनेकांनी कर्दे येथे धाव घेतली. अवघ्या २३व्या वर्षी निखिलचे अपघाती निधन झाल्याने महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तातडीची मदत म्हणून निखिलच्या कुटुंबीयांना महावितरण गुहागरचे कर्मचारी वैयक्तिकरीत्या सहभागातून आर्थिक मदत करणार आहेत. दरम्यान, या घटनेची नोंद सुमित्रा यादव, पालशेत यांनी गुहागरला केली असून, अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल जी. डी. कादवडकर करत आहेत.