खेडमध्ये चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंढ्याची उडवी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या मुलीला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी धनगरवाडी येथील चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास सखाराम कदम (वय ५५, रा. केळणे बौद्धवाडी) हे शेती करतात. रविवारी, १० मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप खरात याच्या गुरांनी फिर्यादी यांच्या घरासमोरील पेंढ्याची उडवी ओढली होती. या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी संदीप खरात, विठ्ठल खरात, सचिन वरक आणि निलेश वरक यांनी फिर्यादी विकास कदम यांना जातिवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि दोन्ही हातांवर जबर मारहाण केली.
वडीलांना वाचवण्यासाठी त्यांची मुलगी वैष्णवी विकास कदम ही मध्ये पडली असता, आरोपींनी तिलाही काठीने मारहाण करून जखमी केले. या घटनेत फिर्यादी विकास कदम हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
याप्रकरणी विकास कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी संदीप खरात, विठ्ठल खरात, सचिन वरक आणि निलेश वरक (सर्व रा. केळणे धनगरवाडी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.









