खेड:- तालुक्यातील भरणे येथे २३ मार्च रोजी रात्री एका घरावर पोलिसानी धाड टाकून सुमारे ८३ गावठी बॉम्ब आणि एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. संशयित आरोपीला शुक्रवारी दि. २४ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता २९ पर्यंत त्याची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे.
खेड तालुक्यातील पन्हाळजे गावात जाणाऱ्या बसच्या चाका खाली दि. १४ रोजी गावठी बॉम्ब फुटला होता. त्याचा तपास करताना पोलिसांना काही माहिती हाती लागली होती. त्या आधारे भरणे येथील एका घरात शिकारीसाठी वापरण्यात येणारे घातक गावठी बॉम्ब असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री आंबवली मार्गावर असलेल्या संशयीत अल्पेश जाधव यांच्या घरावर धाड टाकून घराची झडती घेतली असता त्याठिकाणी सुमारे ८३ गावठी बॉम्ब आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अल्पेश जाधव (वय ३८, रा. भरणे, ता. खेड) याला रात्री चौकशीसाठी ताब्यात घेऊन येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्याला शुक्रवारी दि. २४ रोजी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी दि. २९ पर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.